Sunday, June 15

एकांत...💫

कधीतरी एकांतात बसावे,
गर्दीपासून दूर, शब्दांपासून लांब…
तिथे नसावी कोणतीच चाहूल,
फक्त श्वास आणि मनाचा गूढ गूंज...
THR

Saturday, November 9

विचारातील विचार...🧠


विचारातील विचार...🧠

चर्चा करणं म्हणजे केवळ बोलणं नाही,
सांगणं म्हणजे फक्त माहिती देणं नाही,
विचारणं म्हणजे प्रश्न विचारणंच नाही,
माहीत असणं म्हणजे सर्वकाही समजलेलं असणं नाही...

माहीत करून देणं म्हणजे ज्ञान देणं,
तर माहित करून घेणं म्हणजे शहाणपण स्वीकारणं!

समजावून सांगणं हे समजून घेण्याइतकंच महत्त्वाचं –
पण समजून घेणं,
हे संवादाच्या सर्व पातळ्यांपलीकडचं असतं…

"म्हणणं" वेगळं असतं,
आणि "बोलणं" त्याहून वेगळं...
दोन्हीमध्ये भावना, हेतू, आणि संदर्भ वेगळे असतात.

शब्द एकाच वाटतात,
पण त्यामागची खोली
फक्त समजणाऱ्यांनाच कळते!
THR✨

Thursday, October 17

मनातलं...💫

मनातलं…

नुकतीच आई झालेली ती मुलगी,
शारीरिक थकवा, मानसिक गुंतवणूक, बाळाच्या नव्या जगाची जबाबदारी…
या सगळ्यात हरवलेली होती ती.

मन खूप काही सांगू पाहत होतं,
आणि म्हणून ती माहेरी आली – आपल्या आईकडे,
जिच्या मांडीवर डोकं ठेवलं की
सारा त्रास विसरायला व्हायचं…

पण ह्यावेळी वेगळंच घडलं...

ती आईला आपल्या मनातलं दुःख सांगू पाहत होती,
पण तिच्या आईच्या डोळ्यातसुद्धा काही वेगळंच दुःख दाटलेलं होतं.
आईच्या शब्दांमधील आंतरिक वेदना ऐकून
तिच्या स्वतःच्या शब्दांनीच माघार घेतली…

डोळ्यांतून अश्रू वाहू लागले,
न सांगताही खूप काही बोलून गेले…
पण मन मात्र अजूनही तडफडत होतं –
"काय करावं? कुणाशी बोलावं? कोण समजून घेईल?"

तिनं ठरवलं –
"बस, आता स्वतःलाच सावरणं हाच एक मार्ग आहे."
प्रयत्न सुरू झाले,
दररोज स्वतःला समजावत होती –
"सावर, तू आई झाली आहेस आता..."

पण...
ते ‘सावरणं’ तितकं सोपं नव्हतं.
बाहेर शांत दिसणारं चेहरं,
आतल्या कळांनी ढवळून निघालेलं होतं.

आणि मग एक क्षण आला –
ती फक्त भिंतींना, सायलीच्या फुलांना,
आणि आरशातल्या स्वतःला आपलं मन सांगू लागली…

आई बनणं म्हणजे फक्त बाळाला पाजणं, झोपवणं नव्हे,
तर स्वतःला विसरून, नव्याने जन्म घेणं असतं.
पण स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं –
हे तिला हळूहळू समजू लागलं...

"मनातलं" तिने शेवटी स्वतःच ऐकून घेतलं…
THR✨

Friday, January 19

विचारातील विचार... ✨📝

 विचारांच्या वाटेवर... ✨📝


विचारांच्या वाटेवर,

अनेक विचार नकळत मनाच्या दारात येऊन थांबतात...


अर्णवा… त्या अथांग सागरासारखे विचार –

कधी शांत, कधी वादळासारखे…


याच विचारांच्या लाटांतून

हळूहळू कवितेच्या ओळी जन्म घेतात...


शब्द हे सहज येत नाहीत,

ते विचारांच्या खोल तळातून

हळुवारपणे वर येतात –

कधी श्वासासारखे, कधी अश्रूसारखे…

THR✨


Friday, October 6

मन...3

    नेहमी प्रमाणे काम आटपून ती रूम मध्ये आली... झोपायला नेहमी प्रमाणे जवळ जवळ ११:३० झालेच होते... तिने एक नजर त्याच्यावर टाकली तर तो फोन घेऊन बसला होता... तिने उशी नीट केली आणि पाठ बेडवर ठेकवली आणि डोळे बंद केले... तेवढ्यात तिला तिच्या कपाळावर त्याच्या हाताचा थंडगार स्पर्श तिला जाणवला.... आता पर्यंत ओढलेल्या त्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य उमटलं... तिच्या कानाशी अगदी तिलाच ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात तो बोलतो " *दमलीस का ग?* " तिने हलकं हसून नकारार्थी मान हलवली आणि हळूच नाही बोलली... तिचे ओठ जरी खोट बोलत असले तरी तिचे डोळे खर बोलत होते... त्याने तिला त्याच्या कुशीत ओढल... आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट केलं..... तीही त्याच्या मिठीत विसावली आणि मनात विचार येऊन गेला..." कसं असतं ना हे वेड *मन* ... साध्यासा २ शब्दाने सुखावून गेले... कोण म्हणत सुखी राहायला श्रीमंती गरजेची आहे... आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचे *प्रेमाचे* २ शब्द ही पुरे असतात...ह्या थकलेल्या मनावर हळुवार फुंकर घालायला... मग पुन्हा तयार होत... ते उद्यासाठी" .... ती विचार करत...त्याच्या मिठीत झोपी गेली...

Sunday, June 11

आदर...💫💫

🪞 "आपण स्वतःला दिलेल्या सन्मानावरच

आपला आत्मसन्मान उभा असतो –

दुसऱ्यांच्या नजरेत नव्हे,

तर स्वतःच्या नजरेत मोठं दिसणं गरजेचं!"

THR✨